वेडात पोदारवाले निघाले साथ !! 😎 आम्हां पोदार कॉलेजवाल्यांना महिना - दोन महिन्यांनी कुठेतरी हाईकला जायची खुमखुमी यायची . तर तो काळ होता १९७५ चा , डिसेंबर महिना . आमच्या ग्रुप लीडर विवेकने ठरवलं की यावेळी चौक - कर्जत परिसरातल्या इर्शाळ गडावर हाईकला जायचं . हाईकला जाणं आमच्यासाठी नवीन नव्हतं , पण यावेळी थोडा हटके प्लॅन होता – आदल्या दिवशी दुपारी चढाई सुरू करून संध्याकाळपर्यंत शिखर गाठायचं , रात्री तिथंच मुक्काम करायचा , आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला . असं काही करण्याचं आम्ही आधी कधी ठरवलं नव्हतं – त्यामुळे उत्साह भरपूर आणि थोडी धडधडही . शनिवारी आम्ही सहाजण आधी लोकलने कर्जत , आणि तिथून एस . टी . ने चौक गाव गाठलं . गावाच्या मागे ताठ उभा असलेला इर्शाळचा डोंगर नजरेला पडला – आणि मनात एक विचार झरकन चमकून गेला , " हीच ती जागा , जिथे आज रात्री मुक्काम करायचा आहे ." हळू हळू चालत , थोडंसं खाऊन आम्ही इर्शाळकडे निघालो . सुमारे १२०० फूट उंचीचा हा गड जरा त्रासदायक वाटणार ...