अफगाण चर्च

लहानपणी संध्याकाळी दादांबरोबर (वडिलांना आम्ही दादा म्हणायचो) फिरायला जायला मिळणं दुरापास्त होतं. पण जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हाआम्ही गिरगांव चौपाटीवर फिरायला जायचो. मफतलाल स्विमींग क्लबच्या बाजुची चौपाटी माझी आवडती होती. सुर्यास्ताला काही अवधी असतांना आम्ही पोहोचायचो. समोर समुद्रावर नजर फिरवततांना उजवीकडे मलबार हिलची झाडी आणि बिल्डिंग्ज दिसायच्या तर डावीकडे नरीमन पाॅईंट च्या बिल्डिंग्ज दिसायच्या. त्या बिल्डिंगच्या कोंडाळ्यात एक टोकदार मनोरा आकाशात झेपावलेला दिसायचा. मला त्या टोकदार मनोर्‍याबद्दल सतत कुतुहल वाटायचं. मग एकदा विचारलंच दादांना. ते म्हणाले "अरे, ते अफगाण चर्च आहे". मला गिरगांव चर्च माहित होतं. अफगाण चर्च नांव ऐकल्यावर मला त्या नावांबद्दल कुतुहल वाटलं, पण त्या काळी वडिलांना जास्त प्रश्र विचारता येत नसत. त्यामुळे ते चर्चं माझ्यासाठी कोडंच राहिलं. पुढे एकटा किंवा मित्राबरोबर मरीन ड्राईव्हवर फिरतांना तो सुळक्यासारखा आकाशांत  घुसलेला मनोरा नजरेस पडायचा पण तेव्हा कधी सुचलं नाही की त्या चर्चचा शोध घ्यायला जावं. तो शोध घ्यायचा योग ४-५ वर्षापुर्वी आला.

झालं असं माझा एक मित्र, अशोक सिनकर, याच्या डोक्यात अजुनपर्यंत न पाहिलेली मुंबईतील ठिकाणं पाहायची कल्पना आली.त्याने मला विचारल्यावर मी पहिलं नांव सांगितलं "अफगाण चर्च"! त्याने इकडुन तिकडुन माहिती गोळा केली. आणि मग एके दिवशी आम्ही दोघं कुलाबा मार्केटच्या पुढे असलेल्या अफगाण चर्चकडे जाऊन पोहोचलो. मला तर चर्चची ती इमारत फारच आवडली. कम्पाऊडमध्ये शिरल्यावर सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली की आम्हांला ते चर्च आतुन पाहता येईल कां? आधी त्याने तुम्ही कुठुन आलात? तुम्ही ख्रिश्चन आहात कां वगैरे प्रश्र विचारुन तसेच आत दुरुस्ती चालु आहे असं सांगुन हाकलुन द्यायचा प्रयत्न केला. पण नंतर मोबाईलवर आतले फोटो काढायचे नाहीत या अटीवर आत सोडलं. चर्चचं अंतरंगही भव्य आणि दिमाखदार होतं. भिंतीवर काही योध्द्याची चित्रं रंगवलेली होती. चौकशी केल्यावर कळलंं की अमुक एका वर्षी अफगाणिस्तानांत अफगाणी सैन्याशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या ब्रिटीश सैनिकांची ती पोर्ट्रेट / चित्रं होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते चर्च बांधलं गेलं होतं. म्हणुन त्या चर्चचं नांव अफगाण चर्च ठेवण्यात आलं होतं.  अशा रीतीने लहानपणी पडलेल्या प्रश्राचं उत्तर सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालं होतं. त्या वेळी चर्चचे बाहेरुन एक दोन फोटो काढायला मिळाले होते.

आम्ही घरी परततांना ब्रिटीशांच्या सैनिकांबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनांचं कौतुक केलं. पण काही दिवसांनी अधिक माहिती मिळाल्यावर असं कळलं की त्या युध्दांत अनेक हिंदुस्थानी सैनिक मारले गेले होते. तेव्हा आठवलं की त्या चर्चमध्ये एकाही हिंदुस्थानी सैनिकांच पोर्ट्रेट-चित्र नव्हतं!





Comments

  1. भावना व्यक्त करणे हीच मोठी उपलब्धि असते. बोलण्यापेक्षा लिखाणात त्या उतरवणे हे मोठेच आव्हान उभे करते. त्यात तू बराच यशस्वी झाला आहेस.
    लिहिता रहा. आवडेल वाचायला.

    ReplyDelete
  2. Khupach chaan blog zala aahe. Girgaon chowpaty agdi dolya samor aali. Aaj mala samajhle ki it's called Afghan Church. Mala church madhe jaun yayla pahije aata!

    ReplyDelete
  3. Amazing.. even we came know about such places coz of this article

    ReplyDelete
  4. त्यातली आत असलेली बिलोरी काचेची रंगीबेरंगी नक्षी फार छान आहे. मी पण फक्त बाहेरूनच पाहिले आहे. आतला फोटो मला एकाने पाठवला होता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता