कृपा महाराजाची - एक दिवसात भेट कलकत्त्या

 

|| कृपा महाराजाची||

||एक दिवसात भेट कलकत्त्याची||


दादा एअर इंडियात नोकरीला होते. त्यामुळे दर वर्षी आम्हांला दोन माणसांसाठी  फ्री पास मिळायचा. 

एका वर्षी कलकत्त्याला भेट द्यायची असं  दादांनी ठरवलं. त्यांनी दोन तीन वेळा  संबंधित विभागाशी बोलुन जायचा दिवस ठरवायचा प्रयत्न केला. पण कलकत्ता फ्लाईट नेहमी फुल असायच्या आणि कर्मचार्‍यांसाठी साठी सीट्स उपलब्ध  होत नव्हत्या.

मला वाटतं त्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांना कलकत्त्याला जायला मिळत नव्हतं.त्यामुळे त्या वर्षी  अशा कर्मचार्‍यांसाठी एअर इंडियाने एक अफलातुन निर्णय घेतला.त्यांनी कलकत्त्याला जाण्यासाठी फक्त कर्मचार्‍यांसाठी एक स्पेशल विमान सोडायचं ठरवलं. अट एकच होती कि विमान एके दिवशी सकाळी  कलकत्त्याला जाईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी परत येईल. त्या वर्षीचा फ्री पास  फुकट जाऊ नये म्हणुन बऱ्याच कर्मचार्‍यांनी त्या फ्लाईटचं बुकींग केलं. अर्थात माझे दादा काही त्याला अपवाद नव्हते.

मग एके दिवशी सकाळी दादा आणि मी त्या स्पेशल विमानाने कलकत्त्याला जाण्यासाठी विमानतळावर दाखल झालो.आमच्या विमानाचं नांव "एव्हरेस्ट "होतं (त्या काळी एअर इंडियाच्या विमानांची नावं हिमालयातील शिखरांवरुन ठेवली होती, नंदादेवी ,कांचनगंगा वगैरे) झालं,सर्व फुकट्या प्रवासांना घेऊन "एव्हरेस्ट"ने आकाशात झेप घेतली.

मला  विमानांत चढत असतानाच्या काही  प्रतिमा आठवतात. कलकत्त्याला डमडम   विमानतळांवर  कधी उतरलो ते काहीच आठवत नाही. दादांनी आणि त्यांच्या मित्राने संपुर्ण दिवस कलकत्ता शहरांत फिरण्यासाठी एक टॅक्सी ठरवली होती. त्या  टॅक्सीतुन म्हणे आम्ही कलकत्त्यात  फिरलो. त्या भ्रमंतीतल्या  दोनच  गोष्टी अंधुकशा आठवतात . एक म्हणजे "कालिमाता" मंदिरातील एका मुर्ती पुढे आपटलेलं डोकं. दुसरी म्हणजे दादांच्या मदतीने "ईडन गार्डन" स्टेडियम मधील  ग्राऊंड पाहण्याचा  प्रयत्न! या पेक्षा अधिक काही त्या ट्रीपबद्दल आठवत नाही ,अगदी परत कधी निघालो तेही नाही!

फक्त कर्मचाऱ्यांसाठी अशी फ्लाईट त्यावेळी कोणा एका  एअरलाईन्सने अँरेज केली होती हे  आजच्या काळांत सांगुन खरं वाटणार नाही.

That was a most memorable flight for some employees especially the crew members of Air India in that year.

      

                               ---- हेमंत वाईरकर

Comments

  1. किती वेगळा अनुभव आहे हा! मनाच्या तळाशी साठलेलं असं उचंबळून वर आल्यासारखं लिहिलं आहे. धन्य ती एअर इंडिया आणि धन्य तुम्ही ते प्रवासी जे एका दिवसात काय म्हणत घरी न बसता आलेल्या संधीचा संपूर्ण फायदा उठवला.

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिलं आहे.

    ReplyDelete
  3. कदाचित २/४ वर्षाचा असतानाची ही काळाने धूसर केलेली आठवण तू प्रामाणिकपणे लिहिली आहेस. अशा काही आठवणी आपला पिच्छा सोडत नसतात आणि बालपणाशी आपल्याला जोडून ठेवतात.

    ReplyDelete
  4. हो ...चांगलं लिहिलं आहे .तिसऱ्या वर्षापासून आठवणींच मीटर चालू होतं म्हणतात . ही बहुतेक तुझी पहिली आठवण असावी ......पण मस्त

    ReplyDelete
  5. Waah! Faar chaan aathvan sangrah aahe. Aaj free viman pravas mhanje lottery ticket mhanave!

    ReplyDelete
  6. लेखातली शेवटची ओळ खूप सांगते. वा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता