माझ्या काही कविता

 

तुम्हा वाचकांच्या आग्रहाला मान देऊन मी दोन कविता आपणापुढे सादर करीत आहे, पहिली कविता "सागर किनारी" जी १९७४ मध्ये रेडिओवर वाचली होती आणि दुसरी आहे घरजी नोव्हेंबर १९७७ मध्ये प्रसिद्ध झाली होती.

 

सागर किनारी

निऑन साईंनची चमक

काळोखाची पार्श्वभूमी

खारा भणभणता वारा

सळसळणारे समुद्रजल

 

फडफडणारी दिवटी

धडधडणारा उर

खदखदणारा अंधार

हिरमुसलेला प्रकाश

 

टिळकांचा पुतळा

अपुरा उजेड

चबुतऱ्याजवळ

कबुतरे निर्मळ

 

दूरवर समुद्रात

मिणमिणारी होडी

उसळ्या मारणाऱ्या लाटा

खोलवर डुचमळणाऱ्या सावल्या

 

हळुवार गुंफणारे नाते

थरथरते मऊ वाळूत

ती लाजते ,नजर सावरते

गुंफते ,हात ,हातात

 

 

घर

या आकाशाच्या पंखांना

आधार देत माझ्या आसवांचे

मी बांधायला सांगितले होते

एक घर, एक दार !

ज्याला सीमा नसतील

ज्याला आकार नसेल

ज्याला रंग नसेल

असे अस्पर्शित अपश्यत !

पण मिळाले ,काय तर

दुःखांच्या सीमांनी मर्यादित

निराशेच्या भुतांनी व्यापलेलं

आणि

उदासीनतेच्या रंगाने न्हालेलं

हे हाडा-मासाचे घर !

हे घर घेऊन

मी कुठे जाऊ ?

दगडा-भिंतीच्या या जगात

मी कसा राहू ?

मीच

प्रश्न

बांधले

मीच

उत्तरं

ढासळविली !

सगळ्यांचा नायक

मीच !

सत्ताधीश

मीच !

हे माझ्यातल्या मी

मी तुला शरण आहे !

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

  1. दोन्ही कविता छान आहेत.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर कविता.. पहिल्या कवितेतली वातावरण निर्मिती ग्रेटच! आणि दुसऱ्या कवितेतलं मनस्वीपण! खूप छान!

    ReplyDelete
  3. पुनःप्रत्ययाचा आनंद

    ReplyDelete
  4. पहिली कविता अगदी सुंदर चित्रदर्शी आहे. दुसरीत इतकी निराशा का? पण ती वाचकांना पण खोल जाणवते हेच तिचे यश.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता