आसातु अर्थात आदिम साहित्य तुषार


     पोदार कॉलेजमधल्या काही उत्साही कवी-कवयित्रींनी मिळुन काव्यवाचनासाठी एक व्यासपीठ सुरु करायचं ठरवलं. वर्ष होतं १९७३! मग जमायचं कुठे हा प्रश्र उभा राहिला. कॉलेजमध्ये एखादा वर्ग मिळवुन महिन्यांतुन एकदा जमायचं आधी ठरलं, पण कॉलेजमधल्या वर्गाचं भाडं परवडणारं नव्हतं. तेव्हा एखाद्या शाळेच्या वर्गात जमायची कल्पना पुढे आली. त्यावेळी रवि भगवतेने बालमोहन विद्यामंदिर शाळेत चौकशी केली. त्याच शाळेत शिकला असल्यामुळे त्याने नाममात्र भाड्यावर दर महिन्याला एक वर्ग भेटायला मिळेल अशी व्यवस्था केली. या व्यासपीठाला काय नांव द्यायचं या वर बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी आदिम संस्थेची संबंधित नांव ठेवलं गेलं – आदिम साहित्य तुषार!

    या आसातुची पहिली मिटिंग २१ऑक्टोबर १९७३ रोजी बालमोहन विद्यामंदिर मध्ये संध्याकाळी ५-३० वाजता झाली. प्रारंभी फक्त कवी आपल्या स्व-रचित कविता वाचायचे. नंतर लघुकथा, कथा, एकांकिका आणि चारोळ्या वाचन सुरु झालं. सर्व साहित्य स्व-रचित असल्यामुळे वाचणार्‍यांचा आणि ऐकणार्‍यांचा उत्साह ओसंडुन वाहायचा. लेखन आवडलं असल्यास श्रोत्यांकडुन उस्फुर्त दाद मिळायची. पण आवडलं नसल्यास सविस्तर चर्चा वगैरे व्हायची नाही. कारण वर्ग एक-दीड तासच उपलब्ध व्हायचा. या कार्यक्रमासाठी मी व दीपक जोशी गिरगांवातुन, विनोद हडप वरळीहुन, विलास शेंबेकर व प्रभा सुळे चेंबुरहुन लोकल-बसचा प्रवास करुन, तर शिवाजी पार्क व दादर परिसरांतील रवि भगवते, माधुरी ताम्हाणे, आनंद पत्की, उदय ठाकुरदेसाई, श्रीकांत सोमण, विकास देवधर, सारंग चरणकर, सुधीर म्हात्रे, अरुण म्हात्रे, नंदिनी भावे आणि दत्ता सामंत अशी कवींची आणि रसिकांची मांदियाळी उपस्थित असायची. या शिवाय डोंबिवलीहुन अंजली देव, शिरीष देशपांडे तर ठाण्याहुन प्रदीप गुजर कविता वाचायला यायचे. जयंत गुणे पार्ल्याहुन, विजय खाडिलकर माझगांवहुन, रमेश मोरे लालबाग परळहुन आपलं लेखन सादर करायला यायचे. पुढे नांवारुपाला आलेले दिग्दर्शक अनिल बैंदुर रविच्या शब्दाखातर हजेरी लावायचे.

    त्या काळातील नावाजलेले लेखक-कवी पद्मिनी बिनीवाले, अंजली बिनीवाले आणि उषा गुजराथी यांनीही आसातुच्या मिटींग्जमध्ये श्रोते म्हणुन हजेरी लावलेली आहे.

    ऑक्टोबर' ७३ ते ऑक्टोबर' ७६ या कालावधीत २४-२५ मिटिंग्ज झाल्या. पण नंतर नोकरी-व्यवसायांतील कामामुळे, जबाबदारीमुळे अशा कार्यक्रमासाठी वेळ काढणं कठीण जाऊ लागलं. मग त्या वेळी प्रचलित झालेली कवितांचे अनियतकालिक सुरु करायची कल्पना व्यवहार्य वाटु लागली. उत्साही मित्रमंडळी कामाला लागली आणि आसातु ग्रुपचं नियतकालिक काढायचं ठरलं. पण बहुतेक मित्र-मैत्रिणी आप आपल्या करीयर मध्ये गर्क झाल्यामुळे पहिलं नियतकालिक प्रसिध्द करायला १९७७ मधला नोव्हेंबर महिना उजाडला. या पहिल्या अनियतकालिकाचं संपादन दीपक जोशीने केलं होतं. त्यात सुख - विजय खाडिलकर, अलगुज - सुधीर म्हात्रे, प्रेतयात्रा चालली ती - प्रदीप गुजर, सावल्या - दत्ता सामंत, झाडाची कविता - अंजली देव, मित्र - रवि भगवते आणि घर - हेमंत वाईरकर ह्या कविता प्रसिध्द केल्या होत्या. काही कारणांमुळे हे पहिलं आणि शेवटचं अनियकालिक ठरलं.

    आता मागे वळुन बघताना आश्चर्य वाटतं की एवढे सगळे उद्योग आपणच केले होते ना?


Comments

  1. Apratim! Amhala Ghar kavita vachayla aavadel

    ReplyDelete
  2. Please see poem ' Ghar" in my earlier post of 'Mazya Kahi Kvita

    ReplyDelete
  3. छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  4. केवळ कवितेसाठी हे सर्व आणि सर्वांनी करणे हे आज अद्भुत ! तुझ्या लेखाच्या निमित्ताने मी त्याकाळी बहुतेकांना असणारा अवकाश परत जागवला, आठवला.
    तुझ्या अशा आठवणी, विरंगुळा होऊ पहायतात.

    ReplyDelete
  5. हे सर्व वाचून मला खूप आनंद झाला कारण मी पण या सर्व घटनांची साक्षीदार होते. हेमंत, चांगले काम करतो आहेस. नवे नवे लिहीत रहा. फक्त भूतकाळ नको
    शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर नवीन लिहिणारच आहे .कविता स्फुरल्या तर नक्कीच पोस्ट करेन.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता