धन्य धन्य हो प्रदक्षिणा .....

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुण्यतिथीला ३०० वर्षे पुर्ण होत   असल्याबद्दल    २९ ते ३१ मार्च १९८०  या  दरम्यान रायगडावर होऊ घातलेला  समारंभाची /कार्यक्रमाची    वर्तमानपत्रांतुन  ,रेडिओवरुन आणि  टि.व्ही. वरुन   जोरात चर्चा आणि जाहिरात सुरु झाली होती . कार्यक्रमासाठी त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी रायगडला भेट देणार होत्या. त्या निमित्ताने  मुंबईतील एका गिर्यारोहक  संघाने (Hikers   Group) रायगडला प्रदक्षिणा घालायची  स्पर्धा जाहिर केली होती .अजुन पर्यंत - वेळा रायगड चढुन गेलो होतो त्यामुळे किल्ला माझ्यासाठी अनोळखी नव्हता.परंतु या वेळी किल्ल्याला प्रदक्षिणा घालत चोहो बाजुनी न्याहाळता येणार होते ही माझ्यासाठी पर्वणी होती. ही संधी साधायची असं मी पक्क ठरवलं.                      

  माझ्या जवळच्या  मित्रांमध्ये चौकशी केली पण कोणालाही प्रदक्षिणा घालण्यात इंटरेस्ट नव्हता त्यांचं म्हणणं होतं की गड चढुन जायचा इथपर्यंत ठीक होतं पण प्रदक्षिणा कशाला ? तो काय देव आहे ? मी मनांत म्हटलं की माझ्यासारख्या शिवप्रेमीला रायगड हे देऊळच होतं ज्यात माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज  निवासाला होते.त्यामुळे  रायगडला प्रदक्षिणा घालण्याच्या स्पर्धेला कोणाची तरी साथ मिळवण्यासाठी मी शोध सुरु केला.   सुदैवाने मला साथीदार  माझ्या cousin च्या रुपात सापडला.त्याचं नांव होतं नितांत आंबेरकर ! एका आगळ्या वेगळ्या उपक्रमांत भाग घ्यायला मिळणार म्हणुन तो उत्साहांत होता.त्याने  खटपट करुन महाडमध्ये राहायची सोय होईल अशी एका परिचिताची ओळख काढली.त्यांच्याशी संपर्क साधुन  आम्ही दोघं  प्रदक्षिणा  स्पर्धेच्या आदल्या दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो,

   प्रदक्षिणा स्पर्धा त्या वेळचे ख्यातनाम  हायकर श्री.हिरा पंडीत आणि पत्रकार सोमनाथ समेळ यांनी आयोजित केली होती. प्रदक्षिणेचं अंतर १२कि.मी. होतं आणि कालावधी - तास  काहीतरी होता.नक्की आठवत नाही.त्या स्पर्धेच्या  दिवशी मी आणि नितांत  महाडहुन निघुन स्पर्धेसाठी वेळेवर पोहोचलो.  स्पर्धेआधी आम्हां सर्व स्पर्धकांना नियम समजावुन सांगण्यात आले .कोणाच्या तरी हस्ते फीत कापुन स्पर्धेला  प्रारंभ झाला.त्या वेळी प्रथमच मी त्या प्रख्यात हाईकर हिरा पंडीत यांना  प्रत्यक्ष बघितलं आणि मनांतल्या मनांत साष्टांग दंडवत घातला.  

 स्पर्धेचा पहिला तास आल्हाददायक वाटला .पण नंतर सुर्य जसा डोक्यावर येऊ लागला तसा घाम आणि तहान यामुळे जीव कासावीस होऊ लागला,  आम्हां दोघांकडे प्यायचं पाणी होतं की नाही ते आठवत नाही,पण ठराविक अंतरावर निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे ड्रम पाण्याने भरुन ठेवले होते. स्वच्छ पाणी पिणारा मी त्या ड्रम मधलं पण पाणी अधाशासारखा मागुन मागुन पित होतो .माझ्या cousin ची ,नितांतची  अवस्था पण वेगळी नव्हती. काही स्पर्धक वेगाने चालत पुढे निघुन गेले होते. आम्ही दोघे  दगड-धोंड्यातील वाटेवरुन चालतांना भरपुर दमलो होतो.शेवटचा टप्पा अक्षरश: पाय ओढत पुर्ण केला. आमचा कितवा नंबर आला होता ते आता काही आठवत नाही. 

 स्पर्धा आटोपल्यानंतर पोटपुजा कुठे आणि किती वाजता केली हे आठवत नाही.पण  अंधार पडायच्या आत गडावर  जाऊन जगदीश्वराच्या मंदिरात पथारी टाकायची होती .त्यामुळे जमेल तेवढे जलद चालत गड चढलो. तिथे त्या वेळी जेवणाची आणि नंतर झोपण्याची काय व्यवस्था केली गेली होती ते आता काही आठवत नाही.जरी  पांघरायला  मिळालेली चादर गडावरच्या थंडीला जुमानत नव्हती तरी दिवसभरच्या दमवणार्‍या वाटचालीमुळे झोप पटकन लागली.  

  पहाटे कधी तरी कोणाच्या ओरडण्याने जाग आली .डोळे चोळत कोण ते बघायला  गेलो  तर पोलिस आले होते आणि ओरडुन आम्हां सर्वांना उठायला सांगत होते "उठो  ,उठो  ,अभी  पी.एम . का हेलिकॉप्टर उतरनेवाला है जगह खाली करो "   गाढ झोपेतुन उठवल्यामुळे मनांतल्या  मनांत शिव्यांची लाखोली वाहत  मंदिराकडून  बाहेर पडलो .आजुबाजुला कुंद वातावरण होतं .सुर्योदय व्हायचा होता. कुठेतरी पाण्याची सोय केलेली होती.मुखप्रक्षालन करुन मिळेल तो चहा प्यालो. काही वेळाने  हेलिकॉप्टरच्या पंख्याची भिरभिर ऐकु आली.तेव्हा आम्हां सगळ्यांना दुर हटवुन cordon off करुन ते हेलिकॉप्टर  उतरलं.आम्ही बर्‍यापैकी दुर उभे होतो.हेलिकॉप्टर मधुन त्या  उतरल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला .आम्हांला काही त्या नीट दिसल्या नाहीत .उतरल्यावर त्यांना बंदोबस्तात कुठे तरी नेण्यात आलं. जयजयकार  होत होता आणि लवकरच तो समारंभ/कार्यक्रम सुरु होणार होता.   

   तसंही आमचं काम आटोपलं होतं आणि सरकारी कार्यक्रमांत काही स्वारस्य नसल्यामुळे आम्ही  दोघांनी गड उतरायला सुरवात केली.शिवाय एकदा का सरकारी कार्यक्रम संपला की गड उतरायला प्रचंड गर्दी होणार होती .त्यामुळे शक्य तितक्या घाईने आम्ही गडावरुन खाली उतरुन आलो. पायथ्याशी आल्यावर काय मिळेल ते वाहन पकडुन आम्ही दोघे महाड मुक्कामी जाऊम पोहोचलो.त्या रात्री मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मुंबईला परतलो.                                       

 माझ्या पोदार कॉलेजच्या  ग्रुपमध्ये  रायगड चढुन गेलेले अनेक मित्र होते पण रायगडला प्रदक्षिणा घालणारा मी पहिला आणि एकटाच होतो.त्यामुळे पुढच्या काही हाईकमध्ये डोक्यावर एक अदृश्य शिरपेच घालुन मी उंडारत होतो.

 

 

 

 

 

 

 

 

Comments

  1. छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  2. पण रायगड प्रदक्षिणेचा अनुभव कसा वाटला ?

    ReplyDelete
  3. मुळात लेखाचा मथळा म्हणजे मराठीत title इथेच जिंकला आहेस. तुझी मनस्थिती आणि वर्णन चांगले केले आहे.
    पण स्व. इंदिरा गांधी आल्या असे लिहायला हवे होते. त्या लिहिणे योग्य वाटत नाही. बाकी ओके.शुभेच्छा

    ReplyDelete
  4. लेखाच्या शीर्षक निवडी साठी दिलेल्या कॉम्प्लिमेंट्स बद्दल आभार या पुढील लेखनात हयात नसलेल्या व्यक्तीचा उल्लेख करताना विशेष काळजी घेईन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता