वेडात पोदारवाले निघाले साथ!!😎

आम्हां पोदार कॉलेजवाल्यांना महिना-दोन महिन्यांनी कुठेतरी हाईकला जायची खुमखुमी यायची.

तर तो काळ होता १९७५ चा, डिसेंबर महिना. आमच्या ग्रुप लीडर विवेकने ठरवलं की यावेळी चौक-कर्जत परिसरातल्या इर्शाळ गडावर हाईकला जायचं. हाईकला जाणं आमच्यासाठी नवीन नव्हतं, पण यावेळी थोडा हटके प्लॅन होताआदल्या दिवशी दुपारी चढाई सुरू करून संध्याकाळपर्यंत शिखर गाठायचं, रात्री तिथंच मुक्काम करायचा, आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला.असं काही करण्याचं आम्ही आधी कधी ठरवलं नव्हतंत्यामुळे उत्साह भरपूर आणि थोडी धडधडही.


शनिवारी आम्ही सहाजण आधी लोकलने कर्जत, आणि तिथून एस.टी.ने चौक गाव गाठलं. गावाच्या मागे ताठ उभा असलेला इर्शाळचा डोंगर नजरेला पडलाआणि मनात एक विचार झरकन चमकून गेला, "हीच ती जागा, जिथे आज रात्री मुक्काम करायचा आहे." हळू हळू चालत, थोडंसं खाऊन आम्ही इर्शाळकडे निघालो. सुमारे १२०० फूट उंचीचा हा गड जरा त्रासदायक वाटणार हे माहिती होतंविशेषतः शेवटचा टप्पा.

संध्याकाळचे साडे पाच वाजले असतील. पायथ्याशी थोडी माहिती घेतली आणि आम्ही चढाईला सुरुवात केली. थंडीचे दिवस असल्याने फारसा थकवा जाणवत नव्हता. पुढे विशालवाडीपर्यंत आम्ही गप्पा मारत मजेत पोहोचलो आणि तिथून शेवटचा आणि कठीण टप्पा सुरू झाला.जग्या सर्वात पुढे, मग कीर्ती, चंदू, विवेक, आणि मग मी आणि मक्या अगदी बरोबरीने. अंधार वेगाने पसरत होतात्यामुळे थोडी घाई करत होतो.

तेवढ्यात वरून अचानक मोठा आवाज झाला. आणि जग्याचा घाबरलेला आवाज"Look out! दगड तुटून खाली येतोय!" जग्या वाटेवरच्या एका मोठ्या दगडावर पाय टाकत असताना तो दगड सरकला होता. सुदैवाने तो बाजूला झाला, पण तो मोठा दगड गडगडत वेगाने खाली यायला लागला. मधले सगळे बाजूला झाले. विवेक किंचाळला, "हेम्या, Look out!" आणि काही कळायच्या आत मक्याने मला जोरात बाजूला खेचलं...

...दगड धडधडत माझ्या अगदी जवळून खाली गेला.मी अक्षरशः मरता मरता वाचलो होतो.

त्या क्षणात संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं. मी सुन्न झालो होतो. हातपाय थरथरायला लागले. तेव्हा मी ठामपणे सांगितलं"मी इथंच थांबतो, तुम्ही वर जा."

माझं धैर्य संपलं होतं. मी विशालवाडीतील एका पडवीत जाऊन विवेककडची ३क्ष औषधाची छोटी बाटली अर्धी रिचवली. आणि पडून राहिलो. खरं तर, मी तिथं निपचितच पडलो होतो.

बाकी मित्रांनी मात्र शिखर सर केलं आणि थोड्याच वेळात परतले. ती रात्र आम्ही तिथेच काढलीभीती आणि थकव्याने भरलेली.  माझ्या   मनांत फक्त एकच विचार होता"कधी मुंबई गाठतोय ?”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर निघालो. एस.टी.ने कर्जत, आणि तिथून मिळेल त्या गाडीनं मुंबई.

माझ्यासाठी इर्शाळचा तो अनुभव कायमचा लक्षात राहिला. मी अक्षरशः कैलासवासी होता होता वाचलो होतो.त्या नंतर मी कधीच पुन्हा इर्शाळकडे गेलो नाही.

...आणि हल्लीच, काही वर्षांपूर्वी एका राक्षसी पावसात तोच इर्शाळ डोंगर खालच्या वस्तीवर कोसळला. त्या दुर्घटनेत इर्शाळचं अस्तित्वच संपलं.


माणूस मेल्यावर आपण म्हणतो, तो कैलासवासी झाला.

तर मग एक शिखरही, जे एकेकाळी आमच्यासारख्या तरुणांच्या धाडसाच्या कथा ऐकत उभं होतंते शिखरतो इर्शाळ गड – आता कैलासवासी झालं म्हणायचं का??😥

 

 

 

 

Comments

  1. व्वा सुंदर.
    थरारक प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहिला.
    अशा पोस्ट ,ब्लॉगपोस्टचं नांव सार्थ करतात.
    Kerp it up.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय पाठवत रहा..हुरूप येतो .उमेद वाढते .धन्यवाद दीपक .

      Delete
  2. खूप भयंकर प्रसंग ओढवला होता. तरी तो केवळ दगड होता. कडा नव्हता हे खूप महत्त्वाचे. चांगले वर्णन केले आहे. अजून एका कळसूबाईच्या हायकिंग मध्ये मी पण तुमच्या ग्रुपबरोबर होते. तो पण कठीण होता. साखळ्या धरून चढलो होतो.

    ReplyDelete
    Replies
    1. विविध विषयावर विपुल लिहीणाऱ्या लेखिकेला लेख चांगला वाटला हे महत्वाचं.नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो .नाहीतर मराठी साहित्याची केवढी हानी झाली असती

      Delete
  3. खूप थरारक अनुभव. खूप छान लिहिलं आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कॉलेज मध्ये पटवर्धन सरांचा एकही तास बुडवला नाही म्हणून काहीतरी बरं लिहू शकतोय ,नाही का

      Delete
  4. हेमंत ..सुरेख लेख...हाईकला जाताना पूर्वतयारी करणे अत्यावश्यक आहे..नशीब बलवत्तर म्हणून वाचलास व त्यामुळेच आपली पुनर्भेट होऊ शकली..
    असाच लिहीत राहा....

    ReplyDelete
    Replies
    1. खरंतर तो प्रकार म्हणजे वेडात मराठे वीर दौडले सात असाच होता .नशीब बलवत्तर म्हणूनच वाचलो .परत कधी संध्याकाळच्या वेळी hike ला सुरवात केली नाही .हा प्रसंग घरी सांगितला असता तर माझं hike ला जाणं बंद झालं असतं .

      Delete
  5. थरारक अनुभवाचे उत्कृष्ट वर्णन. छान लेख लिहिला आहेस. खरंच मला फार आवडला. ३क्ष बाटलीमुळे तुझी भीती नक्कीच दूर पळाली असणार. Keep up the good work!

    ReplyDelete
    Replies
    1. त्या भीतीदायक प्रसंगात क्ष क्ष क्ष औषधाची किमंत मला कळली होती . पण नंतर त्याची कधी गरज पडली नाही .आणखी काही सांगण्यासारखे अनुभव आहेत त्याबद्दल लिहीत राहीन .तू पण न कंटाळता तुझं मत कळवत रहा.फार मिलेंगे .

      Delete
  6. हेमंत, मनापासून अभिनंदन. इतक्या वर्षांपूर्वीचा अनुभव अगदी जिवंत शब्दांत कथन केलायस 👍😊. पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा 💐

    ReplyDelete
    Replies
    1. तो जीवन मरणाचा प्रसंग आजही मी विसरलेलो नाही .त्यामुळे लेखनात जिवंतपणा जाणवणारच .आता पुढचा लेख मुंबई दिल्ली मजेशीर प्रवासावर असेल .वाचायला विसरु नकोस

      Delete
    2. नक्कीच. पब्लिश केल्यावर एक पिंग जरूर दे व्हॉट्सअप वर 😊

      Delete
  7. इर्शाळगडाच्या चढाईच्या वेळी तुझ्यावर ओढवलेला प्रसंग आणि अलीकडच्या काळात इर्शाळगडाचे खालील वस्तीवर ओढवणे नी एक दुःखद घटना घडणे हा जो parallel जो तू उभा केलायस तो खूप सांगतो. तुझ्यावर कोणती आपत्ती आली होती त्याचे भयावह रूप उभे करतो.
    मस्त. Keep it up दोस्त!

    ReplyDelete
    Replies
    1. मला असा वाटतं कीं सूर्य अस्ताला जाताना चढाईला सुरवात करणं म्हणजे वेडेपणाच होता .साधारण १२०० फुटांची चढाई आणि गड नाही तर गढी आहे या हिशोबाने धाडस करायला गेलो पण भलताच भयानक प्रसंग ओढवला .मी नाही तर आम्हापैकी कोणीतरी त्या दगडाखाली कैलासवासी झाला असता .दैव बलवत्तर म्हणूनच काही विपरीत घडलं नाही .बाकी तू ज्या parallel बद्दल म्हटलं आहेस ते मला इंटरेस्टिंग वाटलं .असं काही लेखातून प्रतीत होत असेल याची मला कल्पना नव्हती .अभिप्रायाबद्दल आभार .

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता