"बम्बई तो बहुत दूर है"

एअर इंडियावाल्या आम्हां कुटुंबीयांना दर वर्षी विमान प्रवासाचे वेध लागायचे. बरं, जाऊन-जाऊन जाणार कुठे तर कलकत्ता, मद्रास किंवा दिल्ली! कारण भारतात फक्त या तीन शहरांतच एअर इंडियाची विमानं जायची. त्यात दिल्ली शहरासाठी फ्री पास मिळवण्यासाठी स्टाफची चढाओढ असायची. कंपनीतल्या एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या स्टाफमधून फ्री पास मिळवण्यासाठी काय खटपटी-लटपटी करायला लागायच्या, ते माझ्यासारख्या शाळकरी मुलाला काय कळणार? त्यामुळे कधीमधी मी दादांनविचारायचो"आता विमानाने कधी जायचं?"

एके दिवशी कामावरून परतल्यावर दादांनी जाहीर केलं की पुढच्या आठवड्या मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी त्यांना फ्री पास मिळाला आहे. तेव्हा आम्हां दोघां भावंडांना पुन्हा एकदा विमानात बसायला मिळणार याची गंमत वाटली आणि खूप आनंद झाला.

ठरल्या दिवशी आम्ही चर्नी रोडसांताक्रुझ असा रेल्वे प्रवास करून सांताक्रुझ एअरपोर्टला दाखल झालो. आम्ही सर्व मिळून सहाजण होतोमिस्टर नायक, मिस्टर अब्बुकर आणि दादांच्या डिपार्टमेंटमधले मिस्टर शंकरन आमच्या सोबत प्रवास करत होते. सुदैवाने त्या दिल्लीच्या फ्लाइटमध्ये सहा सीट्स रिकाम्या होत्या आणि आम्ही सहाजण आरामात दिल्ली प्रवासाला निघालो.

दिल्लीला उतरल्यावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी लाल किल्ला बघायला गेलो. किल्ल्यात फिरताना तटबंदीच्या एका जागी माणसं आम्हां पर्यटकांना आरडा ओरडा करून बोलवायला लागली. आम्ही काही मंडळी त्वरेने तिथे गेलो. तिथे लंगोटी कसलेला एक प्रौढ इसम उडी मारण्याच्या आविर्भावात उभा होता. बाजूला उभे असलेले "जगह छोड़ो, जगह छोड़ो और देखो" असं ओरडत होते. काहीतरी खुणेचा आवाज झाला आणि त्या लंगोटीवाल्याने तटबंदीवरून खाली उडी मारली. त्याने किल्ल्याखाली असलेल्या मोठ्या विहिरीत उडी मारली होती म्हणे! त्याच्या बरोबर असलेले दोन-चार जण त्याच्यासाठी "पैसा दो, पैसा दो" म्हणत बिदागी मागू लागले.  एवढ्या उंचीवरून उडी मारायचा तो प्रकार बघून मी   पुष्कळ घाबरलो होतो. माझ्या तोंडून शब्द फुटे ना ! मला घाबरलेला पाहून   मला बहिणीला जवळ घेऊन दादांनी तिथून काढता पाय घेतला. तो दिवस लाल किल्ला बघण्यात संपला.

तिसऱ्या दिवशी आम्ही ताजमहाल बघायला आग्र्याला गेलो. प्रथमदर्शनीच मला खूप आवडलापांढराशुभ्र ताजमहाल! माझ्यासारख्या शाळकरी मुलाला ती भव्य दिव्य इमारत पाहून नक्की काय वाटलं ते आठवत नाही, पण तिथून निघूच नये असं वाटलं. त्या वेळी सोबत असलेल्या एअर इंडिया वाल्यांनी त्यांच्या बरोबर आम्हां लहानग्यांचे फोटो काढल्याचं आठवतं. तिथल्या हिरवळीवर आम्ही बहिण-भाऊ पुष्कळ खेळलो. बरोबरची मंडळी हिंडून फिरून दमल्यावर आम्ही सहाजण आग्रा दर्शन आटपून दिल्लीला परत निघालो. दुसऱ्या दिवशी मुंबईला परतायचं असल्यामुळे आम्हां भावंडांना आनंद झाला होता कारण आईची आठवण येत होती.

सहलीच्या चौथ्या दिवशी दुपारी आम्ही सहाजण पालम एअरपोर्टवर दाखल झालो. तिकिट काऊंटरवर चौकशी केली. पण आमच्या दुर्दैवाने त्या दिवशी दिल्लीमुंबई फ्लाइटमध्ये आम्हां पासधारकांसाठी सीट्स उपलब्ध नव्हत्या. "दुसऱ्या दिवशी या आणि बघा" असं सांगून आमची बोळवण करण्यात आली. सकाळी सोडून दिलेल्या लॉजमध्ये पुन्हा संध्याकाळी परत जावं लागलं. पुन्हा दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार! स्टाफसाठी सीट्स खाली नव्हत्या. पुन्हा पदरी निराशा!

खरं तर चार दिवसांची सहल प्लॅन करून दादा आणि त्यांचे मित्र निघाले होते. त्यामुळे मुक्काम वाढल्यामुळे पैशांची चणचण भासू लागली. चणेशेंगदाणे खाऊन वेळ मारून न्यावी लागत होती .दिल्लीतली केळी कापून त्यात मीठ मसाला टाकून खायची आयडिया उपयोगी पडली. लॉजवर बसून वेळ घालवता येईना, त्यामुळे मैदानात बसून वेळ घालवू लागलो. सुदैवाने हवामान सुसह्य होते. माझ्या धाकट्या बहिणीची वेणी-फणीची जबाबदारी मिस्टर नायक आणि मिस्टर अब्बुकर यांनी घेतली होती. ती काय, किंवा मी काय, आईपासून इतके दिवस दूर राहिल्यामुळे रडकुंडीला आलो होतो.

लागोपाठ दिवस मुंबईसाठी सीट्स मिळाल्याने शेवटी दादांनी आणि त्यांच्या मित्रांनी रेल्वेने मुंबईला परतायचा निर्णय घेतला. पैशांची तर वानवा होतीच. मग काय, एअरपोर्टवरच्या स्टाफकडून आर्थिक मदत घेऊन फ्रंटियर मेलची तिकिटं काढली. शेवटी एकदाचे आम्ही एअर इंडिया वाले फ्रंटियर मेलने मुंबईकडे निघालो.

त्या काळी गाडीत बसल्यापासून तिसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला फ्रंटियर मेल पोहोचायची. त्यामुळे आम्ही भावंडं जेव्हा जेव्हा विचारायचो की "मुंबईला कधी पोहोचणार?" तेव्हा उत्तर मिळायचं, "मुंबई तर खूपच दूर आहे"तेव्हा त्या वयातखूपच दूरम्हणजे किती दूर, कळायचं नाही. पण कोळशांवर चालणारं इंजिन असल्यामुळे प्रत्येक स्टेशनांत इंजिनाचे सुस्कारे ऐकल्यावर कळायचं की "बम्बई तो बहुत दूर है!" परंतु खिडकीत बसून मागे पळत जाणारी झाडं, घरं बघताना वेळ मजेत जायचा आणि किती अंतर कापायचं आहे, हा प्रश्न विसरून जायचो.

तिसऱ्या दिवशी बॉम्बे सेंट्रलला उतरून घरी आल्यावर आई म्हणाली, "काय रे, एवढं काळं तोंड करायला कुठे गेला होतास?" तेव्हा कळलं की इंजिनाच्या धुरामुळे तोंड बऱ्यापैकी काळं झालं होतं! त्यानंतर दादा रिटायर्ड होईपर्यंत मी कधीही विमानाने दिल्लीला गेलो नाही.

 

 

Comments

  1. छान मजेशीर प्रवासवर्णन. मस्त!

    ReplyDelete
    Replies
    1. कौतुकाबद्दल आभार

      Delete
  2. एअर इंडियाचा धसका घेतला आहेस का?
    प्रवास वर्णन छान लिहिलं आहेस. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. धसका असा नाही ,,कारण त्या दिल्ली वारी नंतर मी फ्री पास वर मद्रासला आई दादा बरोबर गेलो होतो .कलकत्ता ,दिल्ली आणि मद्रास तिन्ही शहरात मी विमानाने जाऊन आलो आहे बाकी तुला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं .

      Delete
  3. गतकाळातल्या सुखद आठवणी.बालपणात त्या काळात विमानप्रवासचं अप्रूप होतं.तो प्रवास तुला करायला मिळाला हे तुझं भाग्य. ताजमहालासमोर काढलेला तो फोटो पहायला आवडला असता.

    ReplyDelete
    Replies
    1. बालपणात विमान प्रवास करायला मिळाला हे खरोखरच माझं भाग्य होतं.पण त्या वेळी त्याचं अप्रूप वाटत नसे तेव्हा क्रिकेटर्स चे फोटो ,इतर देशाचे पोस्टल स्टॅम्प्स यांचा अप्रूप वाटत असे माझ्या .फोटोचं म्हणशील तर मलाही बघायला आवडला असता पण ते आता शक्य नाही

      Delete
  4. लहानपणाच्या ह्या मेमरीचं मनावरचं इम्प्रेशन छान वर्णन केलेस 👌

    ReplyDelete
  5. काही आठवणी मनांत घर करून राहतात आणि त्या share केल्याशिवाय चैन पडत नाही .त्यातली ही एक आठवण आहे

    ReplyDelete
  6. तुझी फोटो मेमरी आहे का रे. इतक्या लहानपणीच्या गोष्टी तपशीलासह सांगतोस तेव्हा कमाल वाटते. आता हा पेटारा उघडला आहेसच तर तुझे लेख नियमितपणे येऊ दे. दिरंगाई नको.

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या आठवणी तुम्हा मित्राबरोबर share करायला मला आवडतं आहे आणि तुम्हां सर्वाना त्या वाचायला आवडताहेत . त्यामुळे आणखी लिहायला उत्साह वाटतो आहे .आता पुढचा लेख मुंबईतल्या किल्ल्याच्या २०१७ मधल्या सफारी बद्दल लिहिणार आहे .लवकरच भेटू .

      Delete
  7. Replies
    1. माझ्यातल्या लेखकाला ऊर्जा मिळते वाचकांची पसंती कळल्यावर ,आभार .

      Delete
  8. मजेदार आहे तुझे हे एक मार्गी विमान प्रवासाचे वर्णन. दिल्लीत जाऊन दिल्ली पहिली आणि मग केळी, चणे फुटाणे खावे लागले हे आज खरे वाटणार नाही. तेव्हा ऑनलाईन, जी पे नसल्याने अशीच पंचाईत होत असे. पण लोक एकमेकांना मदत करत.असत. नशीब ट्रेन ने यायचे लवकर सुचले!

    ReplyDelete
    Replies
    1. जाताना महाराजा ,येतांना पॅसेंजर असा प्रवास झाला खरा पण दादांच्या मित्रांमुळे सुसह्य आणि सुखरूप झाला .देवाची कृपा !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता