कविता

 

माझ्यातला कोमात गेलेला कवी कधी कधी जागा होतो आणि मी काही ओळी लिहून जातो..

काही वेगळ्या मुडमधल्या कविता पोस्ट करत आहे. 

वाचणार असाल तर आनंद आहे आणि अभिप्राय  देणार असाल तर आभारी आहे.

 

प्रश्न

मी तुला पाहणार

तू नाही पाहणार

हे असे किती दिवस चालणार

काळ्या फिती लावून

तुझ्या घरावरून कितीदां जाणार

---------------------------

फितुर

अचानक समोर आलीस

मग मी शब्द शोधू लागलो

मनात डोकावलं तर काय

बेटे आधीच पसार झाले होते

कल्पना नव्हती की

शब्द तुला फितुर होतील!

 --------------------------

 पाऊस

झाडांच्या फांद्याबरोबर

हिंदकळणारे माझे मन

थंडगार पाऊस शिडकाव्यानं

शहारून उठलं आहे.

मनांत लपून बसलेली तु

या श्रावणधारासारखीच

आठवणींच्या आकाशात

सारखी ये जा करते आहेस

कौलावरून धावत येणारे मोती

ओंजळीत धरून ठेवण्यासाठी

घराच्या वळईतुन अंगणात

मी सारखा येरझारा घालतो आहे

खळ्यातल्या मातीला आवेगाने

आलिगन देणाऱ्या या पाऊसधारा

तुझ्या पडवीत येऊन

तुलाही ओलीचिंब करताहेत,

होय ना?

-- ----------------------------

संध्याकाळ

शहराच्या रस्त्यावर हळू हळू

उतरणारा काळोख

फ्लुरॉसेन्ट मर्क्युरी लॅम्पच्या

भगभगत्या प्रकाशात

उदासीनतेलाअधिक गहिरी करून जातो .

त्या वेळी तुझा आश्वस्त चेहरा

कुठे दिसत नाही,

ऐकू पाहतो तुझी हाक

संध्याकाळच्या  कोलाहलात

अस्पष्ट झालेली....

माझा एकटेपणा अधोरेखित करीत

संध्याकाळ मात्र रात्रीच्या गावाला

निघून जाते

दिव्यांच्या दावणीला मला बांधून.....

 

---हेमंत वाईरकर

Comments

  1. छान.

    जुन्या दिवसांत गेलो.....
    मरीन लाईन्सच्या बाकांवर.

    आता निरंतर जागा राहो,
    तुझ्यातला जागा झालेला कवी.

    आणि रोजची संध्याकाळ निघून जावो,
    तुला कवितेच्या दावणीला बांधून.

    ReplyDelete
  2. चारही कविता एकसे एक आहेत. म्हणजे पहिल्या पेक्षा दुसरी चांगली, दुसरीपेक्षा तिसरी सुंदर आणि तिसरीपेक्षा चौथी अधिक उत्तम. छानच लिहितोस की. का थांबवले होते? आता अशा कविता सतत दिसल्या पाहिजेत! अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील लेखनासाठी!!

    ReplyDelete
    Replies
    1. सिद्धहस्त कवियित्रीची शाबासकी नक्कीच उमेद आणि उत्साह वाढवणारी आहे .आभार.
      कोमातुन जागा झालेला कवी आता कोमेजणार नाही याची काळजी घेईन .

      Delete
  3. खूप छान वाटलं.पूर्वीच्या कवी हेमंतला भेटताना. बघ, दीपक मधला कवीही जागा करून गेला हा हेमंत. वर्षाव घडो कवितांचा

    ReplyDelete
  4. बऱ्या लिहिल्या आहेत तर ! आता वर्षाव नाही पण शिडकावा नक्कीच होईल लवकरच भेटू .

    ReplyDelete
  5. छान आहेत कविता हेमंत. खूप दिवसांनी जागलास आता जागाच रहा हं.
    (मात्र ते कोमा वगैरे पटलं नाही हं मला. प्रदीर्घ निद्रा म्हण हव तर 😊)

    ReplyDelete
  6. जागा राहीन आणि लिहीत राहीन असा शब्द देतो .

    ReplyDelete
    Replies
    1. वाह ! हे छान झाल ! 👍😊

      Delete
  7. फारंच छान लिहिल्या आहेस .  असाच लिहित राहा 

    ReplyDelete
    Replies
    1. तू पण वाचून अभिप्राय देणार असशील तर कां नाही लिहिणार ?

      Delete
  8. हेमंत.. चांगल्या कवितांना दाद देताना तुझ्यासारखा कवी वा लेखक नसल्याने समर्पक शब्द शोधावे लागतात ..सर्वच कविता छान आहेत..
    संध्याकाळ ही कविता वाचताना ही एका सिध्दहस्त कवीची सही शोधत होतो व आपल्या परममित्राचे नाव वाचून आनंद झाला ..खर सांगू थोडा खेदही झाला . तो अशा साठी की आयुष्याचे गणित सोडवताना आपले छंद..आपल्या आवडी यांना मुरड घालावी लागते..तू च नाही तर असे बरेच मित्र व परिचीत पाहिले..आज राखीपौर्णिमेला आपण लहानपणी हात भर राख्या लावून फिरायचो तसे आज या सर्व अव्यक्त कलाकारांची आठवण काढून हातभर काळ्या फीती बांधून फिरायची वेळ आली आहे ! . त्यातील सर्वात महत्वाची काळी फीत तुझ्यातल्या कवीला..हेमंत तुला मन:पूर्वक सलाम..

    ReplyDelete
    Replies
    1. रसिक मित्र -मैत्रिणी मनापासून दाद देत आहेत .तेव्हा लिहिण्यासाठी उत्साह वाढणारच नाही कां ?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!