अत्तराचा फाया!
अत्तर म्हटलं की मला लहानपणीचे दिवस आठवतात. दिवाळीच्या दिवशी दादांनी आणलेल्या अत्तराचा फाया मनगटावर फासला जायचा. तो सुगंध मनांत साठवत दिवाळीचा सण उत्साहात पार पडायचा. गॅलरीत हवेवर लहरणारा कंदील पाहत आणि तळमजल्याला जाऊन फटाके लावण्यात बालमनाला मौज वाटायची.
थोडे मोठे झाल्यावर आई वडिलांबरोबर लग्नाला जातांना अत्तर लावायला मिळायचं. स्वतःला सुगंध जाणवला की खुश होत लग्नात आनंदाने इकडे तिकडे फिरण्यात मजा यायची.
कॉलेजमध्ये अत्तराचा छंद जोपासता आला नाही .नोकरीला लागल्यावर मात्र अत्तराचा फाया फासून नाहीतर परफ्यूमचा फवारा मारून बाहेर पडायला लागलो. छान वाटायचं.
पुढे बँकेत काम करतांना नामांकित S.H.Kelkar Co. तर्फे आम्हां दिवाळीत अत्तराची कुपी/छोटी बाटली भेट मिळू लागली. त्यामुळे अत्तराची आवड निवड पुढे चालूच राहिली.
मला स्वतःला Eau De Colonge हा परफ्यूम फार आवडतो. ह्याचा मंद, संयमी सुगंध मला भावविभोर करून टाकतो. १७०९ जर्मनी मध्ये बनवलेला हा परफ्यूम Cologne ह्या शहराचे लेबल घेऊन जगप्रसिद्ध झाला. तुम्हाला कोणता परफ्यूम/अत्तर आवडतं, सांगाल का?
नंतर कविता आणि शेरोशायरीचा संबंध आल्यावर इत्र म्हणजे अत्तर या विषयावर काही चांगले शेर ऐकले. त्यातले काही सांगतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याद तेरी दिल में यु रह गयी
इत्र जैसे उड गया खुशबू रह गयी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वह दिन हुये की पसीना गुलाब था
अब इत्र भी मलते है तो खुशबू नहीं आती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या मराठीत मात्र अत्तराला लावणीत नेऊन ठेवलं आहे... "अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया, मला आणा राया" असं का?
आनंदाच्या क्षणी, सणावाराला आणि लग्न समारंभात अत्तर लावणारी आपण मराठी मंडळी साहित्यात मात्र त्या संबंधी काही उत्कट का लिहू शकलो नाही? हा मला पडलेला प्रश्न आहे. कोणाला उत्तर माहित आहे का?
एका वेगळ्या विषयावर लिहिले आहेस, हे आवडले. मुलींना आणि बायकांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने लहानपणीच अत्तराची ओळख असते. एक काळ होता की चैत्र गौरीचे, श्रावण शुक्रवारचे, लक्ष्मीपूजननिमित्त असा समारंभ असे. तेव्हा दरबार नावाचे अत्तर हे फेमस होते. आजही त्याचा सुगंध आठवतो.
ReplyDeleteएक सुगंधित विषय आणि सुगर्भीत आशय. मान लिया हेमंत.
ReplyDeleteहेमंत खूप छान.मी कोलोन येथे १७९२ पासून असलेल्या त्या पुरातन दुकानात चार पाच वेळा गेलो आहे.कॉर्पोरेट दिंडी या माझ्या पुस्तकामध्ये कोलोन
ReplyDeleteशहरावर एक प्रकरण आहे.
आपण मध्यमवर्गीय मराठी माणसं म्हणजे सणासुदीला अत्तर लावणारे. (आताची पिढी अपवाद) त्यामुळे अत्तराच्या बाबतीत विशेष दर्दी नाही.त्यामुळे कदाचित अत्तर हा शायरीचा विषय मराठीत आला नसावा. किंवा मी या बाबतीत अनभिज्ञ असेन .असो.
ReplyDeleteपण तू छान लिहिलं आहेस.
एका सुगंधी विषयात हात घातलास. वाचकांना बरोबर गुंतवायचे कल्पना छान. मधल्या व्हिक्टोरियन काळात आपल्या आंग्लाळलेल्या मराठी माणसांनी कदाचित अत्तर ह्या विषयाला माडीवर नेऊन बसविले आणि त्याविषयी बोलणे म्हणजे तोबा -तोबा. कदाचित काही हिंदू संस्कृती रक्षकांनी त्याला मुसलमान म्हणून सुद्धा वर्गीकृत केले असावे. हे सगळे तर्कच त्यामुळे तर्कट वाटण्याचाही मी संभव नाकारत नाही. पण मनात आलेले मांडलेस हे मात्र चांगले.
ReplyDeleteलिखते रहिये जनाब !
भूतकाळात रमतो आहे असं वाटायला लावता लावता शेवटच्या परिच्छेदात तू महत्त्वाचं निरीक्षण मांडलंस. भारी.
ReplyDeleteअत्तर या विषयावरचे " सिंहावलोकन " जमून गेले आहे. लेख आटोपशीर आणि सुंदर झाला आहे.
ReplyDeleteकॉलेजचे दिवसच फुलपाखरी सुगंधित होते म्हणून अत्तराचा शौक त्या दिवसात मागे पडला असावा काय ?
वेगळाच विषय. लेख आवडला.
ReplyDelete